स्पर्श

 

स्पर्श



आज मी पोथी क्लास ला गेले होते नेहेमीप्रमाणे फाटक काकूंकडे . दारावरची बेल दाबली आणि लगेचच प्रसन्न सदा हसऱ्या अश्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने दार उघडले. हो त्याच माझ्या मैत्रिणरूपी , आईसमान, गुरु, फाटक बाई, म्हणजेच रेवती काकूंनी दार उघडले. बैस म्हणाल्या,  आलेच !

काकुंकडे कधीही जा कायम स्वागतच असते .

बरेच दिवसांनी गेले होते आज! प्रशस्त हॉल, त्यामध्ये सर्वदूर भारतभर प्रवास करून निरनिराळया ठिकाणाहून आणलेल्या वस्तूंचे जणू प्रदर्शनाचं भरले होते. कृष्णाची मुर्ति, भिंतीवर काढलेले वारली पैंटिंग, भातुकली, छोटुकल्या कपबशीचा सेट, झुंबर, मोत्यांच्या अनेक वस्तू , दिवे, शंख, शिंपले हार्मोनियम, प्लास्टिक च्या फुलांच्या माळा आणि बरेच काही.

हात पुसत आणि खोचलेली साडी सोडत काकू हॉल मध्ये येऊन बसल्या. मला म्हणाल्या, "किती दिवसांनी आलीस. बरे झाले. मी फोन करणारच होते." मी उत्सुखतेने म्हणाले का हो काकू काय झाले? तर मला म्हणाल्या , " अगं ह्या वेळच्या गुरुपौर्णिमेला मी एक नवीन उपक्रम चालू करायचा म्हणतेय. एक विषय देऊन तुम्हा सगळ्यांना त्या विषयावर आपापले विचार मांडायला सांगणार आहे. मी लगेच म्हणाले, "छान! उत्तम विचार आहे. पण विषय कोणता निवडला आहेत तुम्ही?'' काकू म्हणाल्या अगदी एक शब्दाचा विषय आहे. ओळख पाहु? मला काही सांगता आले नाही.

मग काकूंच म्हणाल्या, "विषय आहे "स्पर्श". मी दोन  मिनिटे गोधळूनच गेले. ह्या विषयावर काय लिहिणार? मला प्रश्न पडला. माझ्या चेहेर्यावरील भावमुद्रा ओळखून काकू म्हणाल्या कि हा फार गहन विषय आहे. लिहायला बसलीस कि बरेच काही सुचेल. प्रयत्न तर कर!

घरी जाताना मी विचार करीतच घरी गेले. गाडी लावतांना मला गाण्याची ओळ आठवली ... "स्पर्श होता तुझा... विसरलो भान मी..... " आणि मग चालू झाली विचारांची एक शृंखला  ..

चटकन वही काढली आणि भर भर लिहायला सुरुवात केली मी.

स्पर्श ,परीस स्पर्श ,मनः स्पर्श ,पावन स्पर्श ,कर्ण स्पर्श ,स्पर्शास्पर्श ,सृजन स्पर्श ,संजीवन स्पर्श ,मुलायम स्पर्श ,मायाळू स्पर्श ,संवेदनशील स्पर्श ,आश्वासक स्पर्श ,काकस्पर्श

 मला सुचत गेले आणि मी लिहीत गेले ..

तर स्पर्श म्हणजे नेमके काय?

आयुष्यात स्पर्श नसेल, तर आपले या जगातले अस्तित्व संपल्यामध्ये जमा आहे. अगदी जन्माला आलेले मुलच  बघा ना. आईच्या पोटात असतांनाच त्याला मायेच्या स्पर्शाची जाणीव असते. म्हणूनच रडायला लागल्यावर आईचा प्रेमळ स्पर्श होताच बाळ रडायचे थांबते. मला आठवते, लहानपणी आईच्या पोटावर हात ठेवून झोपायची सवय होती मला. उभे  राहतांना, चालायला शिकतांना, पळतांना हाच आईचा प्रेमळ स्पर्श लहान मुलांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा असतो.


सायकल चालवायला शिकवतांना बाबांचा तो आश्वासक स्पर्श त्या लहान बालकाला आत्मविश्वास देऊन जातो. "मी आहे" हा आत्मविश्वास तो स्पर्श देऊन जातो.

तरण तलावात पोहायला शिकतांना ह्याच आश्वासक स्पर्शाची परत एकदा अनुभूती येते. ह्यावरून एक जुने मराठी गाणे आठवले ,' तू चाल पुढे तुला रे गाड्या भीती कशाची '

परीक्षेचा पेपर लिहितांना आई आणि बाबांनी सांगितलेले कानावर पडलेले (कर्ण स्पर्श) शब्द आठवतात. पेपर लिहायला बळ देतात.

व्यासपीठावर पदवीप्रदान समारंभात पदवी घेतांना त्याच मोठ्या झालेल्या बाळाचे डोळे आई बाबांच्या  दृष्टी स्पर्शासाठी आसुसलेले असतात. त्यांच्या डोळ्यातील कौतुक बघण्यासाठी  आतुरलेले असतात.

शाळेत मोरपीस गालावरून फिरवल्यावर  होणारा तो मुलायम स्पर्श !



खूप दिवसांनी परत आलेल्या  सैनिकाची  आई /बायको दरवाज्यात वाट बघत असतात. दुरूनच त्या माऊलीच्या अथवा पत्नीच्या डोळ्यां दाटून आलेले प्रेम बघतांच  त्या सैनिकाने सोसलेल्या  हाल अपेष्टांचा एका क्षणांत निचरा होतो. ह्या दृष्टी स्पर्शात फारच सामर्थ्य असते. बायकोने लाडीकपणे फेकलेला दृष्टिक्षेप आणि चिडून टाकलेले दृष्टिक्षेप सर्वश्रुत आहेत. कोणी खाऊ दिला तर तो घ्यावा कि नाही ह्यासाठी आईच्या नजरेत बघणारे बाळ सगळ्यांनाच माहित आहे. घरात कोणतेही महत्वाचे निर्णय घेतांना नवरा बायकोच्या डोळ्यात बघत असतो. आहो रे   सारख्या कार्यक्रमांमध्ये छोटी  मुले आई किंवा वडिलांच्या डोळ्यात बघत गात असतात. प्रेक्षकांची पावती मिळाली तरी पहिली पावती त्यांना गुरु,आई बाबाच्या  नजरेतूनच मिळत  असते.

आजारी असलेल्या वयस्कर आईला, बाबांना, डॉक्टरांच्या नजरेतूनच कळते कि ते बरे होणार कि नाहीत. म्हाताऱ्या व्यक्तीला दिलेला आश्वासक स्पर्श,एका नर्सने ऑपरेशन  झाल्यावर पेशन्टला  दिलेला खंबीर स्पर्श त्या माणसाला परत आपल्या पायावर उभे राहायची ताकद देतो. ऑपेरेशन ला  जातांना डॉक्टरांनी धरलेला हात , त्यांच्या दृष्टीतून मिळालेला आत्मविश्वास त्या पेशन्ट साठी खूप महत्वाचा असतो.



परिस्थितीमुळे खचलेलया व्यक्तीस दिलेला मानसिक आधार हा मानसिक स्पर्शातूनच मिळतो. मनः स्पर्श हा शब्दांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. जसे कीर्तन ऐकतांना, एखादे सुंदर भाषण ऐकतांना, मोठ्या व्यक्तीने समजावून सांगतांना अथवा गाणे, संगीत  ऐकतांना.  मनावर एक छान  संस्कार होतो  मनःस्पर्शातून !

वनस्पतींना सुद्धा स्पर्शज्ञान असते. त्यांना वाऱ्याचा स्पर्श कळतो, पाण्याचा स्पर्श कळतो. ती आनंदाने डोलायला लागतात. माझ्या मनीमाऊला  पण स्पर्श कळतो. दूध हवे असल्यास ती माझ्या पायाला घासून स्पर्श करते.




बरेचदा खूप काही बोलण्यापेक्षा एका स्पर्शातूनच बरेचकाही  बोलता येते. शब्ब्दावाचुन जर बोलायचे असेल आणि नेमक्या भावना समोरील व्यक्तीस पोहोचवायच्या असतील तर स्पर्शाशिवाय दुसरे माध्यम असू शकत नाही.   

परत  एकदा गाणे आठवले

"शब्दावाचून घडले सारे शब्दांच्या पलीकडले..."

काही स्पर्श चांगला अनुभव देतात तर काही स्पर्श अत्यंत वाईट अनुभव देतात.

हेतुपुरस्सर केला स्पर्श नकोसा वाटतो.

एखाद्या राग आलेल्या व्यक्तीच्या जर डोक्यावरून मायेने कुणी हात फिरवला तर ती व्यक्ती लगेचच शांत होते.

आयुष्यात स्पर्श नसेल, तर आपले या जगातले अस्तित्व संपल्यामध्ये जमा आहे...

आजचे डिजिटल जग आहे.  तसे बघयला गेलो  तर आपण जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सगळ्यांशी सतत संपर्कात असतो , तरी पण मानवी स्पर्शाची तोड कशासही नाही.  मानवी स्पर्श नसेल, तर मानवी संवेदनांना तसाही अर्थ उरत नाही. माझी मुलगी अमेरिकेला न्यु  जर्सी येथे असते. व्हाट्स ऍप कॉल वर बरेच बोलणे होते . पण आईला मिठी मारायची मजा त्यात नाही. म्हणुनच कि काय फोन ठेवतांना मला नेहमी म्हणते, "आई मला  घे" दोन्ही हात पुढे करते. आईचा प्रेमळ आणि सहृदय स्पर्श प्रत्येक मुलाला हवाहवासा वाटतो ते काय उगीच नाही. सात समुद्रापार गेलेला मुलगा जेव्हा  परत येतो  तेव्हा तो आपल्या आई बाबांना आवेगाने घट्ट मिठी मारतो. एक आश्वासक स्पर्श त्यातून तो अनुभवत असतो.  सगळ्या भावपूर्ण गाण्यांमध्ये स्पर्श प्राधान्याने वसलेला आहे.

डॉक्टरांनी केलेला तो आश्वासक  स्पर्शच असेल  का संजीवन स्पर्श?

आयुष्यात आपल्याला घडवणाऱ्या काही खास  व्व्यक्ती आपल्या मनाला करून जातात तो परीस स्पर्श. शिल्पकार शिल्प घडविताना करतो तो सृजन स्पर्श. पिंडातील जीवात्मा बघण्याची दृष्टी ही  कावळ्यांस मिळाली आहे. म्हणून मृतात्म्याची इच्छा पूर्ण होई पर्यंत तो कावळ्यांस पिंडास स्पर्श करू देत नाही. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडास स्पर्श करते तो काकस्पर्श. सोवळे ओवळे म्हणजेच स्पर्शास्पर्श





आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक  युगात मानसिक भावनिक पातळीवर निरोगी राहण्यासाठी स्पर्श हे फार मोठे वरदान आहे!

 

लेखिका

डॉ. सुवर्णा देशपांडे

पुणे






Comments

Post a Comment