क्षणाधिश!

 



    

क्षणाधीश!


 


क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं साधयेत्

क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम्

अर्थात- -एक एक क्षण वाया घालवता विद्या प्राप्त केली पाहिजे आणि एक एक कण वाचवून धन गोळा केले पाहिजे. जो क्षण वाया घालवतो त्यास विद्या प्राप्त होत नाही जो कण  वाया घालवतो त्यास धन प्राप्त होत नाही. 

आज बाबांची  खूप आठवण येतेय! मला माझे लहानपण आठवतंय.  तसे कळायला लागल्यावर मी नेहमीच बाबांजवळ जास्त असायचे. माझ्या पाठोपाठ छोटा भाऊ असल्यामुळे आईला माझ्यासाठी जास्त वेळ देता येत नसे. मग सगळ्या तक्रारी असो , हट्ट असो, प्रश्न असोत सगळे बाबांकडे असायचे. माझे बालपण  दोन व्यक्तींच्या संस्कारात गेले. त्यांच्या विचारांचा पगडा आजही मनावर ठसलेला आहे. एक माझे बाबा आणि दुसरा माझा नाना मामा ! नाशिकला आम्ही  मामाच्याच वाड्यात राहत असु. त्यावेळी माझा बहुतांश दिवस  मामाकडेच जायचा.

माझे बाबा मला शाळेतून आल्यावर लागेचच जवळच असलेल्या रानडे मोफत वाचनालयात पाठवत  असत. तेथील लायब्ररी मध्ये असलेल्या बाईंना त्यांनी सांगून ठेवले होते कि बिना तुमच्याकडे आली तर तिला चांगली पुस्तके वाचायला देत जा. शाळेतून घरी आल्यावर काहीतरी खाऊन, दूध पिऊन मी माझा भाऊ दोघेही वाचनालयात जात असू. वाचनालयाची वास्तू  मला आजही आठवतेय. हेमलता  टौकीज च्या मागे एक छोटे ग्राउंड होते, ग्राऊंडच्या शेवटी एक मोठा लाकडी दरवाजा होता आतमध्ये भलीमोठी खोली म्हणजेच वाचनालय होते. त्याच्या जाड भिंतीमध्ये मोठ्या मोठ्या गज लावलेल्या लाकडी दारे असलेल्या खिडक्या होत्या. त्या खिडकीमध्ये बसता येईल एव्हड्या त्याच्या भिंती जाड होत्या. त्या खिडकीमध्ये बसून वाचायला मला भारी आवडे.  सुरवातीला  मला भावाला तीथे जायचा कंटाळा येई. मग हळू हळू चांदोबा, कॉमिक्स , मग छोट्या छोट्या  गोष्टींची पुस्तके असो, आम्हा दोघांचा वाचनप्रवास सुरु झाला. हळू हळू वाचनाची आवड निर्माण झालीमी मग कथा , कादंबऱ्या वाचू लागले. वाचनामुळे मला खूप फायदा झाला. माझे मराठी सुधारले. मला मराठी मध्ये कायम उत्तम मार्क मिळू लागले. माझी प्रगल्भता वाढली. वडील अधून मधून येत असत वाचनालयात. हळू हळू मग बाईंनी मला मोठी पुस्तके वाचायला द्यायला सुरुवात केली. मला आठवते तसे छावा , मृत्युन्जय, ययाती, स्वामी, राधेय मी एका बैठकीत वाचून काढली . रम्य होते ते दिवस.

शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची. ११ वाजता घरी यायचो आम्ही. शनिवार आणि रविवार माझ्या मामाकडे तरुण भारत, गावकरी, देशदूत, टा, लोकसत्ता असे ते वर्तमानपत्रे यायची. मामाचे घर आमच्या खालच्या मजल्यावर होते. प्रशस्त हॉल होता ज्याला आम्ही बंगला म्हणत असु . त्या हॉल ला वर खाली खिडक्या होत्या. खिडकीजवळच मोठे काळे सागवानी लाकडाचे टेबल होते. त्यावर हि सगळी वर्तमानपत्रे ठेवलेली असायची. मामा सतत काहींना काही वाचत असे किंवा लिहीत असे. माझा मामा श्री गोपाळ रेडगांवकर हे त्या काळचे नाशिकमधील प्रसिद्ध लेखक कवी. त्यांच्या  कविता, लेख कायम कुठल्याना कुठल्यातरी वर्तमान पत्रात  येत असत. शाळेतून आल्यावर जेवण झाले कि मला ओढ असायची ती वर्तमान पत्रे वाचायची.  हळूच मग बंगल्यामध्ये जाऊन मी ती वाचत असे. बालमित्र , बालकुंज अश्या  पुरवण्यांचा  मी  वाचून फडशा पाडत  असे. घरी रविवारी सकाळी भ्रमर सायंदैनिकाचे संपादक सदुभाऊ गायधनी, अमृत मासिकचे संपादक मनोहर शहाणे अशी काही दिग्गज मंडळी आमच्याकडे रविवारच्या सकाळच्या चहाला हजार असायची. नवीन केलेले  लिखाण, काही नवीन वाचलेले साहित्य, राजकारण , नाटके , लेख , अग्रलेख ह्यावर मग चर्चा व्हायची . मला ह्या चर्चांमध्ये विशेष रस असायचा. सुधा नरवणे ह्यांच्या सकाळच्या .०५ च्या बातम्या म्हणजे तर सगळ्यांच्याच जिव्हाळयाचा विषय असायचा.  ह्या चर्चामधून आमच्या मनावर नकळत संस्कार घडत गेले. दिवाळीची सुट्टी लागली कि मग ओढ असायची ती दिवाळी मासिकांची. चंगळ असायची तेव्हा. जोडीला दिवाळीचा फराळ. मामा दिवाळी अंकासाठी कथा पाठवीत असे. त्याची कथा छापून आली कि मग संपादकांकडून घरपोच मासिक पोस्टाने पाठवले जात असे.

मग काय आमच्याकडे  वाचन दिवाळी साजरी होत असे. रोज दुपारी जेवणे झाली कि मामा आमच्याकडे ती मासिके घेऊन येत असे. मग त्या कथांचे वाचन होत होई , त्यावर चर्चा होई . आम्हा लहान मुलांना फार काही कळत नसे पण सगळ्यांबरोबर तिथे बसून कवितांचे, कथांचे वाचन  ऐकण्याची भारीच  मजा येई . कवितांमध्ये एखादा शब्द जर चपखल बसत नसेल तर मामा आईला शब्द सुचवायला सांगे. मग कवितेत फेरफार होई.

माझ्या मनावर वाचनाचे साहित्याचे संस्कार  असे नकळतच घडत गेले.  क्षणा क्षणाला , प्रतिक्षणाला माणसाने सतत काहीतरी शिकले पाहिजे  म्हणजेच विद्या, ज्ञान संपादन केले पाहिजे अथवा अर्थ म्हणजेच पैसे कमावला पाहिजे. त्यावेळचा हा संस्कार मनात  खोलवर  कुठेतरी रुजलेला आहे. आजही खूपवेळ टी  व्ही  बघितला, फारवेळ झोप काढली तर मनाला ओशाळे वाटते. आपण फार वेळ वाया घालवला असे वाटते .. एक अपराधीपणाची जाणीव होते.

किती सहजपणे पूर्वीच्या काळी मनावर संस्कार व्हायचे. आजच्या  पिढीने जाणीवपूर्वक असेच संस्कार पुढच्या पिढीला दिले तर मग जगणे सहजसुंदर होईल. रात्री उशिरापर्यंत नेटफ्लिक्स  बघणारी सकाळी ११, १२ च्या पुढे झोपेतून उठणारी मुले बघितली कि ह्याची जाणीव प्रकर्षाने होते!

जग झपाट्याने बदलते आहे. आजच्या डिजिटल युगात  गॅजेट्स चा  सुळसुळाट आहे. गॅजेट्स आपण वेळ वाचवण्यासाठी वापरतो. पण त्या वाचलेल्या  क्षणांना वेचता यायला हवे.  धकाधकीच्या ह्या क्षणभंगुर आयष्यात आपल्याला  प्रत्येक क्षण  जिंकता यायला  हवा. प्रत्येक क्षणाचे सोने करता यायला हवे! ज्याक्षणी तुम्हाला ह्या क्षणाचे महत्व उमजेल, तत्क्षणी तुम्हाला त्याची किंमतही कळेल!

 

लेखिका 

डॉ सुवर्णा देशपांडे

पुणे

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पर्श